अजिंठा - ७

पाण्याच्या निरभ्र प्रवाही आरशात 

प्रतिबिंब 

काळ्याभोर गर्द पहाडाचं.

लेण्यांचं.

त्याचे  डोळे अधीर उत्सुक 

बेहद्द धावाधाव पावलांची.

दहा पाच माणसांची.

बोली नीट कळत नाही 

तरी समजून सगळ्या 

असल्या नसल्याची 

सवयीनं हळूहळू सोबत लोकांची.

तबकड्या, भेंडोळे, कागदांचे कुंचले टाकून 

पहिल्या दरबारात लेण्याच्या 

तो विरघळून जातो पूर्णाकार.

गर्भगळीत त्याच्या शरीरातल्या 

शक्तीचा सगळा पारा निथळून पडतो 

तो पुन्हापुन्हा छिन्नीतल्या 

दवी रेषांवर दगडांच्या 

नजर टाकून पाहतो.

रंगांचे आवर्त. प्रभामंडळातले 

पुष्पमाला घेतलेले गंधर्व 

ओठांवर मुलायम लालसर रंग 

गोंदणारी शृंगारातली सकवार बाई 

शिबी राजाच्या गोष्टी.

गौतमाच्या पूर्वजन्मीच्या 

जातक कथा कित्येक भिंतीभिंतींवर.

राजवाड्याचे दालन 

कुठल्या रंगाचे आरेखन

त्याचे  डोळे विच्छिन्न होतात पुन्हापुन्हा.

गिल अधाशी डोळ्यांचा. पुन्हापुन्हा अस्वस्थ.

पद्मासनातल्या भव्य गौतम बुद्धाच्या 

मूर्तीजवळ थांबतो 

मान उंचावून टकटक पाहतो 

सुन्नपणानं बुद्धाच्या पायाजवळ बसतो

नि:शब्द 

आपण काय पाहतोय त्याला कळत नाही

क्षणभर. तो कंदिलाचा, मशालीचा उजेड 

भिंतीजवळ घ्यायला सांगतो.


मी  जगातला एक श्रेष्ठ चित्रकार.

त्याच्या अहंतेचा अंधार निथळून पडतो सरकन

तो  अबोल 

अधीर कित्येक दिवस.

सत्तावीस लेण्यांमधून 

भणंग भटकताना.

हाताला कांहीच सामर्थ्य नसल्यागत.

एकाकी.

त्याचे तरारलेले डोळे 

पुन्हा बहरून येतात 

कागदावर हळूहळू रेषा उमटतात

आपोआप रंग ओले होत जातात.

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena