उपसलेल्या तलवारीसारखे आमचे धारदार तारुण्य-
तुम्ही खुशाल म्हणा,
आम्ही डोक्यात राख घालून घेतलिये
तुम्ही खुशाल म्हणा,
आम्ही वेडाने पछाडलो आहोत
खरंच आम्ही वेडे आहोत.
आणि आम्ही स्वत:हून डोक्यात राख घालून घेतलिये
कारण आम्हाला एक विचाराची दिशा आहे..
आमच्या मनाचा कल हा मानव्याच्या सर्वकष मुक्तीचा आहे..
खरंच आम्हाला उठवलंय एका जगमान्य इच्छेने.
खरंच आम्हाला इच्छा झालीये शोषकांच्या
रक्ताने रंगलेले आमचे पंजे सन्मानाने मिरवायची.
त्यांना कसे असणार हे ठाऊक
की आमच्या डोक्यात एक सृजनाचा राक्षस आहे,
त्याला जर आम्ही काम दिलं नाही,
नाचवलं नाही तर तो आम्हालाच
खाऊ शकेल बिनदिक्कत..
आणि म्हणून उपसलेल्या तलवारीसारखे आमचे
धारदार तारुण्य-
एका नव्या जगाच्या वेडासाठी आम्ही
त्यास कड्यावरुन झोकून देत आहोत.
- नामदेव ढसाळ
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment