मध्यरात्र!
बाहेर पाऊस कोसळतोय..
छपरावरली तडतड वाढत चल्लीये
तुझ्या अठवणींसकट..
’तिकडे पाऊस पडतोय का रे?’
वळचणीचं पाणी तळहातावर झेलत
मी ’हो’ म्हणायचो फ़ोनवर
आपल्या दोघांना जोडणारा तो पाउस
आज कोसळ्तोय माझ्या घरावर
तुझ्या घरावर कोसळतोय की नाही
मला ठाऊक नाही..
जरी कोसळत असला तरी
तुझ्या डोळ्यांत आभाळ दाटून आल्यावर
समोरचा रस्ता थोडाच बुडणार आहे पाण्यात आज
डोळे भरुन तू थोडीच गाणार आहेस
’लट उलझी सुलझा जा बालम..’ माझ्यासाठी.
मला छेडण्याने तुझ्या तारांवर
स्पंदनं थोडीच उठणार आहेत आज?
मला ठाऊक आहे
ऋतू बदलले की झाडांना पर्याय उरत नाहीत..
आणि सुमित्रा,
या ऋतूतल्या
या मध्यरात्रीच्या पावसाने
मलाही पर्याय सोडलेला नाही
आपले जुने पावसाळे आठवण्यावाचून..
- सौमित्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment