तुझे शब्द माझे शब्द- शांता शेळके

तुझे शब्द माझे शब्द
दूर भांबावून उभे
मध्ये अनामिक द-या
वाहणारया काळोखाच्या
ऐलतीरी पैलतीरीं
सूर गुंफ़िती बासरया

तुझे शब्द माझे शब्द
विस्तारत विस्तारत
होत जातात धूसर
मुक्या अवकाशामध्ये
मिळताही मिळेचना.. त्यांचा मिळेचना स्वर

तुझे शब्द माझे शब्द
अनोळखीपण त्यांचे
कसे कोण सांधणार?
साचलेल्या अभावाच्या
नि:स्तब्ध या डोहावर
पूल कोण बांधणार?

-शांता शेळके

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena