माझ्या मित्रा,..- अरूणा ढेरे

ऐक  ना,
मला दिसते नुसते चमकते अपरंपार आभाळ,
अलीकडे दाट काळ्या रात्रीची शांत झुळझुळ,
बासरीच्या एखाद्या माधवी स्वरासारखा
तीव्रमधुर तिथला वारयाचा वावर
आणि मुक्त असण्याची
त्यात एक मंद पण निश्चित ग्वाही.

कितीसा पाहिलेय मी हे स्वप्न
झोपेत आणि जागेपणीही!

आज तुला ते सांगावेसे का वाटले कळत नाही
पण थांब, घाई करु नकोस
अर्धे फ़ुललेले बोलणे असे अर्ध्यावर खुडू नाही

हे ऐकताना हसशील, तर मर्द असशील;
स्वप्न धरायला जाशील माझ्यासाठी
तर प्रेमिक असशील;
समजशील जर शब्दांच्या मधल्या अधांतरात
धपापतेय माझे काळीज,
तर मग तू कोण असशील?

स्वप्नच होशील तर परमेश्वर असशील,
हाती देशील तर पती असशील,
आणि चालशील जर माझ्यासोबत
त्या उजळ हसरया स्वप्नाकडे
समजून हेही, की ते हाती येईल न येईल,
पण अपरिहार्य माझी ओढ, माझे कोसळणे,
धापत धावणे
आणि माझा विश्वास, की माझे मलाच लढता येईल;
तर मग तू कोण असशील?
-मित्र असशील माझ्या मित्रा!

-अरूणा ढेरे

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena