अरे तुझी टोपी
तुझी टोपी गेली खडड्यात
कपाळ पहिलं संभाळ
काय डेंजर वारा सुटलाय
डोसक्यात कचरा
धूळ धूळ डोळ्यात
साहेबाची खिडकी फ़ुटली
गादीवर काचा काचा
आपोआप गुंडाळतोय
पंजाब्याचा गालिचा
पार्शिणीचा फ़्लावरपाट
गडबडा लोळतोय
सिंधीणीच्या दांडीवरली
म्हागडी नायलॉन साडी
चालली वारयावरती हवाई झाज
नवव्या मजल्यावरच्ल्या
बंगाल्याचा लेंगा लगेच
लागला तिच्या पाठी
खापरांना फ़ेफ़रं भरलं
फ़डफ़ड करतायत पाखरांसारखी
कुलकर्ण्याच्या भिंतीवरल्या
डिगरया ठिकरया फ़रशीवरती
नारया नारया तुझा बाप
सटकला की फ़ोटोमधनं
मैदानावर जिकडंतिकडं
एसेस्सीचे पेपर
धावत्या मर्सडीजवर
कडकडकडाट झाड पडलं
प्रोफ़ेसरसाहेब तुमची
कविता गेली उडत
पळा पेंटर
र्हाऊदे रंगाचं डबडं
झ्यायरातपत्रा खडखड करतोय
तुम्हीच रंगवलेली पंचवीस फ़ुटी हेलन
तुमच्या बोकांडी बसणाराय
धेंगात मानगूट पकडणारय
मास्तर मास्तर बघा कसा
हिसडे मारतोय भिंतीवरती
भारताचा नकाशा
गेला उडत खिडकीबाहेर
डोंगरांसकट नद्यांसकट खुंटीसकट
गेला सरळ आकाशात
-अरुण कोलटकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment