खेकडे- अरुण कोलटकर

ते बघ ते बघ
दोन खेकडे बघ ते
कसे टपलेत

कुणावर टपलेत म्हणून काय विचारतोस
अरे तुझ्यावर
बघतायत बघ कसे

तुझ्याकडं बघातायत
आणखी कुणाकडं
कसे एकटक बसलेत

एक हिकडं एक हिकडं
बरोबर १६० अंशांचा कोन करुन बसलेत
एक डावीकडं एक उजवीकडं

डोळे खाणारायत तुझे
घाबरलास कशाला
म्हणजे अगदी आत्ताच खाणारायत असं नाही

आज नाहीतर उद्या
उद्या नाहीतर परवा
नाहीतर आणखी धा वर्षांनी रे

त्यांना काय
त्यांना कसली घाई आहे
बघून घेतील सावकाश

इकडं बघ इकडं
सगळीच मुंडी हलवू नकोस
बुबळं इकडची इकडं कर

दिसतोय का एक खेकडा
सबंध नसेल दिसत एवढ्यात
अर्धा दिसतोय ना

आता इकडं बघ इकड्म
अरे बुबळ्म इकडं कर
इकडं पण अर्धा दिसतोय ना

नाहीतर नुसते डेंगे दिसत असतील रे
आहे की नाही
दिसेल आख्खा खेकडा पण दिसेल

अजून टाईम आहे रे
त्यांना काय दुसरा धंदा आहे का
हेच त्यांचं काम

अरे हे तुझेच खेकदे
अगदी स्वताचे
त्यांना कुठं दुसरयातिसरयाचे डोले खाण्यात इंट्रेस्टाय

तुझ्या डोक्यातनंच उपटले
लानाचे मोठे झाले
बघ कसे लडदू बसलेत

बसलेत आज बघू
उद्या बघु करत
कपाळावेगळे झाल्यापास्नं

तुझेच डोले खाणारायत
तू म्हणशील तेव्हा
की झालं काम

संबंध मिटला


-अरुण कोलटकर

2 comments:

Suchikant V said...

I wanted to understand meaning of this poem, where can i get it?

Shraddha Bhowad said...

सुचिकांत,

कवितेचा अर्थ असा कुठे मिळेल हे सांगता येणार नाही. सर्वसाधारणपणे, कविता अभ्यासक्रमात लावली असेल तर तिचा सोकॉल्ड प्रमाणित अर्थ मिळून शकतो. पण, ऍझ पर माय नॉलेज, खेकडे अभ्यासक्रमाला लावलेली नाही.

तुला हवं असल्यास मी मला कळलेला अर्थ तुला सांगू शकते. प्रत्येक व्यक्तीचं अनुभवविश्व, विचार किती समृद्ध आहेत यावरून तिला कवितेचा काय अर्थ कळतो हे ठरतं, आणि तस्मात, ते व्यक्तिगणिक बदलतं. तुलाही कविता वाचून काहीतरी कल्पना आलेली असणारच. बघूयात, आपल्या कल्पना किती जुळतात ते.

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates