स्वप्न- ग्रेस

शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षाळण करणारी
चंद्रभागा मी पाहिली नाहीं, आत्मसंवादाची
हीच प्रचिती आली माऊलीच्या उरावर
पाय ठेवतांना.

शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
प्राणांचें मोल देऊन मुक्ति विकत घेत
असतोम मी; देहूच्या बाजारांत अभंग
विकणारया तुकारामाप्रमाणें-शापच आहे 
मला संगमरवरांत स्वप्न लपवून ठेवण्याचा.
चाहुलवेडया वाटुलीच्या प्रतीक्षेत चरणगंधाच्या
स्मृतीचें फ़ूल उमलतांना पाहिलें नाहीं मी,
वाचली नाहीं सांद्र तमागारांत काजव्यानें
रचलेली प्रकाशगाथा; पण फ़ुटलेल्या
डोळ्यांच्या निरांजनांत तुला ओवाळणारी शिळा
पाहिली आहे रे..
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.

-ग्रेस

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena