प्रेम करावे


हिरवे हिरवे माळ मोकळे
ढवळ्या ढवळ्या त्यावर गा‌ई
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घा‌ई.


प्रेम करावे, रक्तामधले
प्रेम करावे शुद्ध, पशूसम
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.


प्रेम करावे मुके अनामिक
प्रेम करावे हो‌उनिया तृण
प्रेम करावे असे, परंतू,
प्रेम करावे हे कळल्याविण

1 comment:

  1. विंदांच्या कविता नेहमीच खोलवर परिणाम करत आल्या आहेत.

    *विंदा करंदीकर* 

    स्वेदगंगा (१९४९), मृद्गंध (१९५४), धृपद (१९५९), जातक (१९६८), विरूपिका (१९८१). मार्क्सवादाच्या ठामपणापासून सुरू झालेला हा काव्यप्रवास व्यक्तिगत भावजीवनातील तरल संवेदना, सामाजिक वास्तव, आध्यात्मिक कुतूहल असे अत्यंत पार्थिवापासून ते अपार्थिवाच्या टोकांपर्यंतचे व प्रगल्भ प्रौढ मनापासून ते अनघड बालमनापर्यंतचे विविध जीवनानुभव सहज कवेत घेत विरूपिकांपर्यंत येऊन थांबला - म्हणजे त्यांनी स्वेच्छेने थांबवला. त्यांच्याच शब्दांत - 
    _'कवीप्रमाणेच कवीची प्रतिभाही मर्त्य असते. हे कठोर सत्य, शांत व स्वच्छ नजरेने मस्ती पाहू शकते. कधी तो आधी जातो, कधी ती आधी जाते, पण सत्तरीची प्रतिभा अजून सतरा वर्षाची आहे असे मानून बाविशीतल्या मधुचंद्राचे अवसान खरा कवी कधीच आणीत नाही. असे अवसान न आणणे हाच कवीच्या मस्तीचा शेवटचा आविष्कार.’_

    कलाकारावरील वाङ्मयीन जबाबदारी ओळखून कवितेबरोबरच भाषांतरं, तत्त्वचिंतन, अर्वाचीनीकरण व फार महत्त्वाचं असं समीक्षा लेखन विंदांनी केलं. 

    विंदा हे माझ्या लेखी असामान्य कवी होते. संवेदनशीलता, तर्कशुद्ध वैचारिकता, वाचन ही त्यांची बलस्थानं होती. विंदांच्या चौकस व कुशाग्र बुद्धीने चौफेर संचार केला. इतका की कधीकधी मला असं वाटतं की त्यांची प्रतिभा काही वेळा निखळ आकर्षणाने या बुद्धीचा माग काढत गेली.

    पण अर्थात करंदीकरांमध्ये विंदा या कवीबरोबरच एक समतोल समीक्षक सतत होता. त्यामुळेही असेल पण जे काही सांगायचंय ते कसं सांगायचंय याचं भान कधी सुटलं नाही. आशय व घाट यांची सांगड नीट विचारांती घातलेली दिसते. अर्थात कधीकधी वैचारिक तर्कशुद्धतेमुळे येणारा यांत्रिकपणा देखील येतो असं मला काही कविता वाचून वाटतं, पण त्यात फारकत नसते.  

    कुठल्याही संवेदनशील व सहृदय व्यक्तीच्या सामाजिक भानाप्रमाणे विंदांचं सामाजिक भान हे समाजातील व्यक्ती व त्यांच्या परिस्थितीच्या कारुण्यातून जन्माला आलं होतं. मग तो धोंड्या न्हावी असो व बकी. साम्यवाद हा त्यांच्या बुद्धीला त्यावेळेस पटलेला एक उपाय होता. जेव्हा ते पटेनासं झालं तेव्हा न लागू पडणारं औषध बंद करावं तसं त्यांनी ते सोडून दिलं. अर्थात कलेतून कलाकाराच्या तत्त्वनिष्ठा शोधण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे कलाकृतीतील जाणीवनिष्ठा हीच महत्त्वाची. ( _"जाणिवेशी एकनिष्ठ राहण्याची जबाबदारी स्वीकारली की आशावादी असणे किंवा निराशावादी असणे, शून्यवादी असणे किंवा मूल्यवादी असणे या गोष्टींना प्राथमिक महत्त्व उरत नाही. कलावंतांचे स्वातंत्र्य म्हणजे अशा पूर्वनिश्चित विचारापासून विमुक्त राहण्याचे स्वातंत्र्य. कोणत्याही जातीची जाणीव असो, तिच्यातील सौंदर्यात्मक घाट प्रकट करणे ही एकच जबाबदारी त्याच्यावर असते. जाणीववादाच्या पुरस्कर्त्याला मी काल कोणता सूर छेडला व उद्या कोणता छेडीन याचा विचार करण्याची जरुरी नसते. मला 'आत्ता' व 'इथे' भेटलेल्या जाणिवेचा अंगभूत सूर कोणता हे ओळखता आले पाहिजे व तो शब्दांत छेडता आला पाहिजे."_ 
    (काही प्रश्न : काही उत्तरे/महाराष्ट्र टाइम्स ५ अॉगस्ट १९६२) 

    सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना ठाम तोडगा सुचवत सुरू झालेली कविता अनिश्चिततेच्या वाटेने, _शब्दातीताला मातीत खेळवत_ निरर्थकापलीकडचा अर्थ शोधू पहाते. या प्रवासात आपल्याला चिंतन, प्रेमाचे विभिन्न पैलू आणि अर्थातच समाजाभिमुखता किंवा खरं तर मानवाभिमुखता, हे सारं भेटत जातं. विदांच्या कवितेचा आवाका मोठा आहे. त्यांच्या यशस्वी कवितांची उंची व विचारांची खोली हे नेहमीच मला स्तिमित करत आलं आहे. त्यांच्या कवितांवर पुनःपुन्हा दृष्टीक्षेप टाकायला जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताची गरज नक्कीच नाही पण या निमित्ताने जरी आपण त्यांच्या कविता पुन्हा तपासल्या तर मराठी कवितेला पुढे न्यायला किती समर्थ आधारस्तंभ मिळाले आहेत हे अधिक प्रकर्षाने जाणवल्यावाचून राहणार नाही. 

    आजच्यासाठी त्यांची ही एक प्रसिद्ध कविता - 

    *कसा मी कळेना*
    कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची;
    कधी वाढता वाढता व्योम व्यापी
    कधी धावतो विश्व चुंबावयाला
    कधी आपणाला स्वहस्तेच शापी

    कधी याचितो सत् कधी स्वप्न याची
    कधी धावतो काळ टाकुन मागे
    कधी वर्षतो अमृताच्या सरी अन्
    कधी मृत्युची भाबडी भीक मागे

    कधी दैन्यवाणा, निराधार होई
    कधी गूढ, गंभीर, आत्मप्रकाशी
    कधी गर्जतो सागराच्या बळाने;
    कधी कापतो बोलता आपणाशी!

    कधी आपणा सर्व पिंडात शोधी;
    कधी पाहतो आत्मरुपात सारे;
    कधी मोजितो आपणाला अनंते
    अणुरूप होती जिथे सूर्य, तारे

    टळेना अहंकार साध्या कृतीचा;
    गळेना महापुच्छ स्वार्थी स्मृतीचे;
    कधी घेतसे सोंग ते सत्य वाटे!
    कधी सत्य ते वाटते सोंग साचे!

    कधी संयमी, संशयात्मा, विरागी
    कधी आततायी, कधी मत्तकामी
    असा मी.. तसा मी.. कसा मी कळेना;
    स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी!
    (- विंदा करंदीकर) 

    © कौस्तुभ आजगांवकर 
    (२३ अॉगस्ट २०१८)

    ReplyDelete

 
Designed by Lena