शून्याखाली चाळीस अंश तापमान असताना लिहीलेली प्रेमकविता

प्रेम करायला मन पुरतं
पण अंग मात्र पुरत नाही
बर्फ़ाच्या वर्षावासारखंही प्रेम
मी पाह्यलंय, सैराट वारयात
फ़क्त खिडकीतून-
सेंट्रल हिटींगच्या उबेतून

अंग पुरत नाही प्रेम करायला
कारण एकमेकांना भिडणारांमध्ये
अंतर जास्त जास्तच जीवघेणं होत जातं:
अणूपेक्षाही नाहीसं झालेलं मन, धन-परमाणूचं-
ज्याचा वेग मोजला तर ठिकाणा सांगता येत नाही
आणि ठिकाणा सांगीतला तर दिशा कळत नाही-
अनिश्चिततेच्या तत्वासारखं ते असतं तिथं नसतं

आणि बर्फ़, ज्याचं पडणं दिसतं वेल्हाळ
उबदार अंतरावरुन,
खरं तर असतो एक शुभ्र आणि विक्राळ
प्रेमाचा जाहीरनामा-
ज्याच्या वाक्यावाक्यांत असतं
बेभान विस्मरणाचं विश्वव्यापी फ़र्मान.

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena