पाणी

जेव्हा पाण्याच्या पापण्या लवतात
तेव्हा पाण्याच्या डोळ्यात
प्रकाश लाजून चूर होतो.
पाणी डोळे मिटून घेतं
तेव्हा तुम्हाला दिसते लाट.

जेव्हा पाण्यचे डोळे पाण्याने भरतात
तेव्हा सगळंच पारदर्शक झालेलं असतं
आणि त्यातून दिसतो पलीकडचा दुष्काळ

पाण्याच्या बाहुल्या विलक्षण विस्फ़ारतात
आणि विलक्षण संकोचतात
तेव्हा पाण्याचा पडल्यापडल्या
पाऊस झालेला असतो.

पाण्यात फ़ार वेळ खेळू  नये.
ताप येतो
आणि तोही असाध्य ठरतो.

पाणी दिसतंसुद्धा
फ़क्त काठावरुनच.
त्याला हात लावलात आणि तो ओला झाला
तर ते पाणी समजू नका
तो फ़क्त आपलाच ओला हात.

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates