आमच्या आळीतून जाताना -नामदेव ढसाळ

हे महाग्यानी लोक
हिंडतायेत मशाली पेटवून
गल्लीबोळातून, आळीआळीतून

जेथे उंदिर उपाशी मरतात-
त्या आमच्या खोपटांतील
काळोख, म्हणे, यांना कळतो.
पाणचट गवशीसारखे हेही एक थेर!
ज्यांना आपल्या गांडीखालचाच अंधार कळत नाही
त्यांनी पेटलेल्या माणसांना
छप्पन्न टिकली बहुचकपणा
अजूनही दाखवावा!

अरे धूर्तांनो,
ज्यांना तुमची नसननस कळलिये
त्यांच्याशी तरी इमान राखा
आणि ज्याना उजेड दिसत नसेल
त्यांना तुमच्या मशाली खुशाल दाखवा;
आमची ना नाही.

मात्र एक.
आमच्या आळीतून जाताना
त्या विझवूनच पुढे जा
आज आम्हाला, या खोपटां-खोपटांतून
पूर्ण सूर्य दिसतोय!

-नामदेव ढसाळ

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates