तू तलम अग्नीची पात..- मलिका अमर शेख

तू तलम अग्नीची पात, जशी दिन रात जळावी मंद
तू बंध-मुक्त स्वच्छंद, जसा रानात झरा बेबंद
तू तलम अग्नीची पात..

लडिवाळ बटा गुलजार छटा, तू मृदमायेचा हात
तो तंग चंद्र अन् हले पालवी, शीतल संथ जळात
ही मखमालीची शेज सखे, अन् जळते दाहक अंग
ही रात चांदणी कोरत जाते, प्रणयामधले रंग
तू तलम अग्नीची पात..

तू अल्लड नवथर थरथर देही, जसे थरथरे पाणी
त्या पाण्यावरला तरंग मी, अन् भास वेगळा राणी
रानात बहर अंगात जहर, अन धुंदफ़ुंद ते श्वास
मिलनी मग्न ते सर्प जसे की टाकतात निश्वास
तू तलम अग्नीची पात..

या अवघड वेळी नकोच बोलू, तव ओठांची भाषा
या रानालाही कळते अपुल्या डोऴ्यामधली भाषा
असे असावे जीवन आणि असे जुळावे नाते
ही रात असावी गात स्वरांनी तुझे नि माझे गाणे
तू तलम अग्नीची पात..


-मलिका अमर शेख

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates