एक वडाचे झाड -मलिका अमर शेख

एक वडाचे झाड चिमुकले, एक दिवाणा चिमणा
चोचीमध्ये घरटे होते, घरटयामध्ये एक शहाणा
एक शहाणा बसला होता, विणत नदीची गती
काठावरती आले काही गोजिरवाणे हत्ती
एक कहाणी ठुमकत ठुमकत पाणी भराया आली
शहाणा झाला वेडा, त्याची कुंठित झाली मती
वीणही सुटली, धागे सुटले चुकता तोल जरासा
घागरीत त्या अडकून बसला शहाणा झाल मासा
घागर घेऊन निघून गेली गोष्ट जरा सावळी
पाऊलवाटा मिटल्या विरल्या रात्र उरे जांभळी
चकित झाला चिमणा आणि वटवट करते नदी
सारे सोडून निघून जाणे जमले नाही कधी
काठावरले झाड वडाचे, हसले पानांत
कुण्यावेळच्या कुठल्या गोष्टी सांगे कानात.


-मलिका अमर शेख

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates