मध्यान्हीच्या मनात येते- विंदा करंदीकर

मध्यान्हीच्या मनात येते-
आत्म्याची ऐकावी घरघर;
पाप्याशी एकांत करावा
ज्वाळांच्या जळत्या शेजेवर.

मध्यान्हीच्या मनात येते-
घट्ट धरावे अवघड जागी;
उभें जिवाला पिंजित न्यावे;
नग्न करावे भाव अभागी.

मध्यान्हीच्या मनात येते-
सूड असा दिवसाचा आपण
घ्यावा; आणिक जखम करावी
जिथे उमगतिल बुजलेले वण.

मध्यान्हीच्या मनात येते-
आणिक होते तेच खरोखर!
या पाप्याची रात्र सरेना
दिवस जरी आला डोक्यावर.

-विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates