ओंजळीत स्वर तुझेच- विंदा करंदीकर

ओंजळीत स्वर तुझेच
अन स्वरात श्वास तुझा;
क्षितीजाच्या कठडयावर
कललेला भास तुझा.

ओंजळीत स्वर तुझेच
अन स्वरात वेध तुझा;
दबलेल्या इच्छांतिल
स्वप्नांना छेद तुझा.

ओंजळीत स्वर तुझेच
अन स्वरात स्मरण तुझे;
डोहाच्या काठावर
वाटेला वळण तुझें

ओंजळीत स्वर तुझेच
अन स्वरात गंध तुझा;
लयवेडया अर्थाला
फ़क्त एक बंध तुझा.

-विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates