तीन प्रवासी- विंदा करंदीकर

विमान आले डुंबत डुंबत
अंधारातुन
आणि उतरले तीन प्रवासी
चिंचेच्या अर्ध्या पानावर.

एक म्हणाला,
’आज विसरलो नाक घरी मी’
नंतर दुसरा
’परवा माझे असेच झाले;
स्वस्थ झोपलो डोळे उघडुन
आणि भावली पळून गेली’
तिसरा वदला,
’अता दुधाचा प्रश्न न उरला,
काल नवी मधमाशी व्याली.’

इतक्यामध्ये
अंधाराच्या नाकावरती
एक काजवा येऊन बसला.
त्याला पाहुन ते म्हातारे
परस्परांच्या धरुनी शेंड्या
इतके हसले,
इतके चळले
उरलेल्या अर्ध्या
पानांतिल
दवबिंदूतच ते विरघळले

-विंदा करंदीकर

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates