विळखे- आरती प्रभू

काल तू नव्हतीस,
आज तू आहेस,
उद्या तू
असणार असशील होत्या-नव्हत्याच्या लाटांवरील संधिप्रकाश.
नैवेद्य मागणारा काळ
अक्राळविक्राळ,
उपाशी
तरीसुद्धा कळ्या गिळणारी एक पाशवी समर्थ असोशी :
तिची सोनेरी छटा मुक्त कचपाशावरील.
सन‌ईच्या सुरावटीतील स्वरांचे सुरवंट प्रभातकालीन
तसेच तुझ्या पाहण्याचे प्रहर, त्यांतील धुक्याचे कुसुंबी क्षण
विषमय नव्हेत तरीसुद्धा
बेहद्द उद्दाम :
त्या डोळ्यांनी तू केलेली बदनामीही बदामी असते;
अद्दल घडलेले घडे फुटूनसुद्धा भरलेले असतात;
चक्कर देणारे भोंगळ बहाणेही ससाणे होतात;
वाटायला लागतें की आम्ही कोण तुझ्यापुढे ?
दु:खाचा डोंगर रचणाऱ्या पापण्या उचलून पाहतेस
तेव्हा सूर्योदयावरील मेघखंडालाही स्तनाकार मिळतात,
सापडतात विचित्र आकार लहरी हवेला
आणि निर्झरांच्या सोनसाखळ्या उस्कटून पडतात रानोमाळ,
भासमान होतात मंद्रसप्तकाचे जन्म-आदिकाल,
झाडांचे बुंधे समंधांसारखे रात्री खातात ओरबाडून
आणि मातीच्या कणाकणांतून कळे धरतात गेलेले पावसाळे.
हें छप्पर खरेंच आहे
पण त्याखालचे आधार अंधारस्तंभांसारखे विळखे देतात.
काल तूं नव्हतीस ?
खरें नव्हे. आज तूं आहेस ? खरें नव्हे.
उद्या असणार ? खरें नव्हे.
फक्त तो एक शिल्पकार खरा ज्याने वाऱ्याला दिले
झाडाझुडपांचे स्पर्श, विळखे.

-आरती प्रभू


0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates