प्लॅटफ़ॉर्म- सदानंद रेगे

प्लॅटफॉर्म..
पिसाट पावसाने
काळाला दिलेला
क्लोरोफॉर्म..

समोरच्या तारेवरचा
तो चिंब कावळा
पावसातच सुकवतो आहे
आपली पिंजारलेली पिसे.
त्याच्या चोचीतला
जाणिवेचा थेंब
केव्हाच उडून गेला आहे.
रुळांच्या वळणावरचा
तो तांबडा सिग्नल
पावसातच पडतो आहे
सावल्यांचा नमाज.
त्याच्या काळ्या कफ़नीवरचा
नेणिवेचा डोळा
केव्हाच भिजून गेला आहे..
आहे नाहीत मिटले आहे.
काळाचे पा‌ऊल थिजले आहे.

प्लॅटफ़ॉर्मवर उरलो आहे
मीच काय तो एकटा
हा कावळा माझा नाही
हा सिग्नल माझा नाही
खिशातल्या सिगारेटचा
झाला आहे भुकटा..

या मेलेल्या काळाचे धूड कोण ने‌ईल?
कधीही न येणारी माझी गाडी
या स्टेशनात कधी ये‌ईल?

-सदानंद रेगे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates