दुपार-सदानंद रेगे

या ग्रंथसंग्रहालयात
नि:शब्दाच्या हातातील
ते कोरे पुस्तक
पहा कसे पेंगत आहे
डोक्यावरच्या या वेडपट पंख्याला मात्र
दुपारची कधीच
झोप येत नाही!
सूर्यफ़ुलासारखी उमलणारी
उन्हाचा स्कर्ट घातलेली
बॉबकट केकेली
ती मुलगी
केव्हापास्नं घुटमळते आहे
कवितासंग्रहाच्या कपाटांपाशी!
(पण तेही बेटं झोपी गेलेले दिसतंय
ढाराढूर...)
समोरच्या टेबलावर बसलेला
आईनस्टाईनसारखे केस पिंजारलेला
तत्वज्ञानाचा प्रोफ़ेसर
घेतो आहे लिहून भराभर
झोपाळु बोटांनी
गलेलठ्ठ पुस्तकातले काहीतरी
झोपेला आलेल्या अक्षरांत..

बाहेर..
उन्हाच्या झाडाखाली
कलंडलेली सावली
घेऊ लागली आहे डुलक्या
अन तिच्या हातांतली
ती पेंगुळलेली कादंबरी म्हणते आहे :
आता पुरे गं!
मला झोप येते आहे!

-सदानंद रेगे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates