कठोर दगडी सत्य- शांता शेळके

कठोर दगडी सत्य
कधी कधी लांब उभे असते
निळसर धुक्यात गुरफ़टून;
एखाद्या सुंदर स्वप्नासारखे,
पुरातन किल्ल्यासारखे,
किंवा ऐतिहासिक स्मारकासारखे;
-खुणावून बोलावते जवळ, घालते साद
फ़िकट कुतुहल जागवतो अस्पष्ट शब्दाचा नाद.

कठोर दगडी सत्य
कधी कधी अचानक समोर येते
राक्षसासारखे पुढ्यात उभे राहते
आपला चेहरा जबरदस्तीने स्वत:कडे  वळवते
अनागताशी नकोसे नाते जुळवते.

आणि एखाद्या अपरात्री
कुठल्यातरी भीषण विदॄप स्वप्नातून
अचानक जाग येते.
सर्वांग घामाने निथळत असते,
जीभ टाळ्याला चिकटलेली असते,
तेव्हा कठोर दगडी सत्य
बसलेले असते आपल्या छातीवर
डोळ्यांना डोळे ताठ भिडवून
सुटकेच्या सारया वाटा निर्णायकपणे अडवून.

-शांता शेळके

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates