डुबुक- रघू दंडवते

एक खडा टाकला
तर डुबुक
आवाज येईल
ह्या विहीरीतनं

पण कशाला टाकायचा खडा
राहू दे ना ती विहीर तशीच निवांत

ह्या अंगाला एक रस्ता आहे
त्या अंगाला पण एक तसाच रस्ता आहे
दोन्हीकडे आपापली गडबड चालू आहे
विहीरीला काही ऐकू येत नाही
त्यांना पण विहीर माहित नाही

आणखी जरा पलीकडे मनुष्यवस्ती
काही घरं दिसतायत पण जरा लांब
विहीरीशी त्यांचंही घेणंदेणं नाही
हे सगळं विहीरीला बरंच आहे
आपल्या आपण निवांत

ह्या बाजूला पडलेल्या विहीरीकडे
उगाच काय ते बघायला कुणी गेलाच तर
काय दिसणाराय

निवांत विहीर
निवांत पाणी
एक अल्लद बेडूक
तरंगणारा आपल्याशीच
आनंद

नजरानजर झालीच
त्या बेडकाशी तर
-डुबुक

मग काय
विहीर-पाणी-निवांत

-रघू दंडवते

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates