रक्तगंधाचे दिवे- ग्रेस

सांज ढळता स्पन्दनापरि झाकली तू लोचने
सूर्यज्योतींची विरागी थांबली आंदोलने
आंधळ्या पाण्यात गळती शुभ्र पक्षांचे थवे
लावितो मी रक्तगंधाचे दिवे…
रंग माझे वाहुनी ने गंधविरही शांत वारा
चंद्रव्याकुळ सावल्यांचा या इथे पडला ढिगारा
कोणत्या बंदी युगांनी आज केली आर्जवे ?
लावितो मी रक्तगंधाचे दिवे…
गात्र मळले वादळातिल धूळ काळी माखुनी
प्राण क्षितिजाच्या दिशेने चालले मंदावुनी
पाय शिल्पातून उठती की धुक्यातुन आसवे ?
लावितो मी रक्तगंधाचे दिवे
धावती घोडे उताविळ वाकली झाडे पुढे
कैफ वेचावा कशाने नाद ये हृदयापुढे
आज माझ्या प्राक्तनातूनि सांडताती काजवे ?
लावितो मी रक्तगंधाचे दिवे..

-ग्रेस

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena