जिना - वसंत बापट


कळलें आता घराघरांतुन
नागमोडिचा जिना कशाला
एक लाडकें नांव ठेवुनी
हळूच जवळी ओढायाला

जिना असावा अरुंद थोडा
चढण असावी अंमळ अवघड
कळूनही नच जिथे कळावी
अंधारांतिल अधीर धडधड

मूक असाव्या सर्व पायर्‍या
कठडाही सोशीक असावा
अंगलगीच्या आधारास्तव
चुकून कोठे पाय फसावा

वळणावरती बळजोरीची
वसुली अपुली द्यावी घ्यावी
मात्र छतांतच सोय पाहुनी
चुकचुकणारी पाल असावी

जिना असावा असाच अंधा
कधिं न कळावी त्याला चोरी
जिना असावा मित्र इमानी
कधिं न करावी चहाडखोरी

मी तर म्हणतों-स्वर्गाच्याहि
सोपानाला वळण असावें
पृथीवरल्या आठवणींनी
वळणावळणावरीं हसावें...!

- वसंत बापट

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena