पांढरे हत्ती- ग्रेस

पांढ-या शुभ्र हत्तींचा
रानांतून कळप निघाला;
संपूर्ण गर्द शोकाच्या
झाडांतहि मिसळून गेला.

त्या गूढ उतरत्या मशिदी
पक्ष्यांनी गजबजलेल्या;
कल्लोळ पिसांचा उडता
आभाळ लपेटुन बुडल्या.

पांढ-या शुभ्र हत्तींनी
मग डोंगर उचलून धरले;
अन तसे काळजाखाली
अस्थींचे झुंबर फुटलें …

मावळता रंग पिसाट
भयभीत उधळली हरिणें;
मुद्रेवर अटळ कुणाच्या
अश्रूत उतरलीं किरणे.

पांढरे शुभ्र हत्ती मग
अंधारबनांतून गेले;
ते जिथे थांबले होते
ते वृक्ष पांढरे झाले...

-ग्रेस

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates