अडगळीची खोली- सदानंद रेगे


अडगळीच्या खोलीत येते
कणीदार धूळ माहेरवासाला
वाळवीचे पांढुरके बि-हाड बरोबर घेऊन...

तपकिरी घोड्यावरचा
बिनडोळ्यांचा अंधार शोधीत असतो
फुरफुरत्या नाकपुड्यांनी
चुकचुक पालीची गुलाबी अंडी...

वाजू नये थंडी
म्हणून विणू लागलेले असतात विंचू
कोळिष्टकांचे स्वेटर...

बाजाच्या पेटीचा भाता कुरतडणा-या
बायकोला म्हणत असतो
मनुकांचे डोळे
टेलिफोनच्या डायलसारखे फिरवणारा
अलबुखारी उंदिर:
मी नाही येणार तुझ्याबरोबर सिनेमाला
अडलंय माझं खेटर!

याच खोलीत असतो
जरीची वाटोळी टोपी घातलेला
आखूड चड्डीचा ऍनेमिक ग्रुप फोटो
आजोबांनी काढलेला
त्यांच्या आजोबांबरोबर...

इथेच असतात
सद-याची हरवलेली बटने,
इथेच विचारतात ती
तोत-या झुरळांना:
भटो, भटो.. काय तुमचा मोटो?
झुरळीं पुटपुटतात:
क...क...स....ला मोटो...नि
क..सलं...का...य
आ...आम्हांला हवा आ...हे बै...दा फ्राय
देता काय?

अडगळीच्या खोलीत करते
जागता पहारा
माहेरवाशीण मातीची मंगळागौर
हव्याहव्याला येतो पूर
नको-नकोचा होतो चूर

अशी ही जगावेगळी
अडगळीची खोली...
वेडगळीची डोली...

-सदानंद रेगे

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates