भूल - ग्रेस


प्रकाश गळतो हळू हळू कि; चंद्र जसा उगवे

पाण्यावरती उमटत जाती अंधुक अंधुक दिवे


दूर सनातन वृक्षांना ये हिरवट गंध मुका

दु:ख सुरांच्या क्षितिजापाशी मेघ दिसे परका


हिमनगरातील बर्फ धुळीचे उत्सव भरले नवे

धुक्यात तुटल्या शिखरांवरती पक्ष्यांचे हे थवे


मंदीर मंदीर पाणी पाणी शिल्प कुठे वितळे

दु:खाच्या तंद्रीतून जैसे अमृत ठिबकत निळे


माझ्या हातून मूठभर माती अवकाशावर पडे

घराघरांना मरण फुलांची गंधित भूल जडे

- ग्रेस

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates