काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?- अरुणा ढेरे


काय करु शकाल तुम्ही तिच्यासाठी?
द्याल तिच्या तान्ह्या श्वासांना
जखमी न होता मोकळं जगण्याचं एक साधं आश्वासन?
तिचा वाढता बहर वेचण्यासाठी
उतावीळ तुमच्या अभिलाषा,
ठेवाल मुळाशी निरोगी माती घालण्याची मायेची आठवण?
स्वप्नचुटुक वाटेवर चालणारी
तिची तरुण नाचरी पावलं आणू शकाल माघारी,
तुम्ही पेरुन ठेवलेल्या स्फोटक आणि भयकारी वास्तवापासून?
अडवू शकाल तिच्या निरागस इच्छांवर
तुमच्या विषारी स्पर्धांच्या अग्निलोलकांतून कोसळणारं
संवेदनांची ओल गाभ्यापासून नष्ट करणारं उग्र आणि निर्मम ऊन?
रोजच्या रोज घरात बळी जाणारं
सोशिक विवाहितेचं कौमार्य कराल परत
तिच्या अनीह रतिकर्माची दु:सह आठवण पुसून?
उमलण्याच्या आणि दरवळण्याच्या सगळ्या शक्यता सांभाळून
जडवाल तिला तिच्या इच्छांच्या सगळ्या कळ्या, पुन्हा फुलवून
ज्या गळून पडल्या तिच्या देहावरुन?
कसं काही करु शकाल तुम्ही तिच्यासाठी,
हजारो वर्षांच्या संकेताच्या झगमगीनं तुमचे डोळे दिपल्यानंतर?
आणि अंधारात पूर्ण जागी असलेली ती तर जाणूनच आहे
तुमचं मस्तक आणि हृदय यातलं अहंभावाचं अटळ अंतर...

-अरुणा ढेरे

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena