परदेशातून परदेशात- विलास सारंग


प्रतिबिंबाचं प्रतिबिंब पडावं; तसा
इथे चकचकीत येऊन पडलो
बदललेल्या कोनामधून
शिलगावलेली अंतरं अजमावीत

पोतड्यांमधून संस्कृती
सरावानं काढून मांडली:
राजस्थानी बाहुली हस्तिदंती हत्ती
चढवली इथल्या भिंतींवर
काली आणि गणेशाची निधर्मी पोस्टरं
(भिंती सारख्याच असतात
कुठंही गेलं तरी)

नकाशातलं आणखी एक टिंब
पसरतं आहे टिपकागदावर

मनावर
नव्या तपशिलाची नक्षी
आभाळात
जेटची जबर इच्छाशक्ती

-विलास सारंग

0 comments:

Post a Comment

 
Design by Pocket Blogger Templates