जाणारे दिवस- विलास सारंग


सकाळची पहिली
सर्वात सुंदर सिगरेट
मग खोलीत येरझारा
पण सगळ्या पाकिटांमधल्या सगळ्या सिगरेटी
शुष्क, कोरड्या होऊन गेल्या आहेत
य रुक्ष, उष्ण प्रदेशात:
भुरभुर जळतात कापरासारख्या
घसा अधिकच कोरडा करीत.
कुणीतरी सांगितलं होतं
सिगरेटच्या पाकिटाच्या आत ठेवावं
एक ताजं, हिरवं पान,
म्हणजे सिगरेटींमध्ये ओलावा कायम राहतो.
पण इथं तर
मैल-मैल चालत गेलं कुठल्याही दिशेनं
तरी, ताजं, हिरवं पान आढळणार नाही.

येरझारा.
न वाजणा-या टेलिफोनकडे अधूनमधून पाहत
येरझारा.
अधूनमधून खिडकीतून बाहेर पाहत.
भगभगीत उन्हात
भेगाळलेली क्षारयुक्त जमीन
इथं-तिथं सुकल्या पानाच्या जागी
क्षाराचे पांढुरके पापुद्रे.

संध्याकाळी सूर्य कलल्यावर
हायवेवरुन फेरफटका.
क्वचित जाणा-या एखाद्या ट्र्कविना
दुसरं काही, दुसरं कुणी नाही.
हायवेवरचे दिवे मात्र
एव्हानाच लावून ठेवलेले आहेत,
समोरच्या संधिप्रकाशात
निळसर दिव्यांच्या रांगा
कशा निस्तेज, विचित्र भासतात
अर्थशून्य प्रकाशाच्या रांगा
अवास्तव, अतिवास्तव.

रात्री उष्ण बिछान्यावर पडून
निश्चेष्ट ऐकतो
टेलिफोनची वायर
उंदिर कुरतडत असलेला,
स्वप्नात वा प्रत्यक्षात.

-विलास सारंग

No comments:

Post a Comment

 
Designed by Lena